सा विद्या या विमुक्तये
– डॉ. वसुधा विनोद देव
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक भारतीय असंतोषाचे जनक, उत्कृष्ट लेखक, धुरंधर राजकारणी, तत्वज्ञ, समाज सुधारक, श्रीमदभगवदगीतेचे भाष्यकार, थोर राष्ट्रभक्त, थोर द्रष्टे अशा अनेक भूमिकामधून आपण त्यांचा आदर करतो। परंतु त्यांचे शिक्षण विषयक विचारांचा ज्या प्रकारे उहापोह होणे गरजेचे होते तेवढे झाले नाही आणि आज जेव्हा आपण NEP २०२० च्या दालनात प्रवेश करीत आहोत तेव्हा एक बाब नाकारून चालणार नाही की आज ज्या विचारांचा आपण अंतर्भाव शिक्षण प्रणालीत करीत आहोत हे विचार शिक्षण तज्ज्ञ मा। लोकमान्य टिळक ह्यांनी ह्यापूर्वीच मांडले आहेत।
लोकमान्यांची लेखणी जी विविध विषयावर भाष्य करीत होती त्यात शिक्षण ह्या विषयाला सुद्धा तिने केवळ स्पर्शच केला नाही तर भारतीय विचारधारेनुसार पुढील किती तरी पिढ्यांचा विचार त्यांनी केला आणि म्हणून ते द्रष्टे ठरतात। शिक्षणाबाबतची विलक्षण आस्था त्यांना होती। शिक्षणाचा सर्वांगीण विचार त्यांनी केला। भारतीय समाजाच्या मनाची जडण घडण, भारताचा उज्वल इतिहास, भारताची सांस्कृतिक परंपरा, ब्रिटिशांनी स्वतःच्या राज्यकारभारासाठी पूरक ठरणाऱ्या व्यक्ती निर्माण करणारे नि:सत्व ध्येयशून्य शिक्षण व त्याबाबतचा रोष व ह्या तत्कालीन परिस्थितीत त्यांनी सुरु केलेले राष्ट्रीय शिक्षण, अशा अनेक बाबींचा विचार त्यांनी केला। शिक्षण हे राष्ट्रहित साधणारेच असावे हा त्यांचा अट्टाहास होता। देशाची शिक्षण पद्धती ही देश हिताचीच असायला हवी हाच त्यांचा अट्टाहास त्यांच्या विचारात आपणास पहावयास मिळतो। “विद्यापीठे म्हणजे परीक्षा घेऊन पदवी देणाऱ्या कंपन्या झाल्या आहेत” अशी टीकाही त्यांनी विद्यापीठीय शिक्षणाच्या बाबतीत केल्याचे आढळते। विद्यापीठे ही विद्वत्तेची माहेरघरे असावी ही त्यांची धारणा होती, आपण ज्याला राष्ट्रीय शिक्षण म्हणतो, राष्ट्र निर्मिती करिता शिक्षण म्हणतो, ह्या संकल्पनांचा उगम त्यांच्या विचारात बघावयास मिळतो असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही। कारण राष्ट्रीय शिक्षण हे शिक्षण विषयक ध्येयाच्या अंतिम सध्याचे पहिले साधन ते मानतात। देशाभिमान वाढविणारे शिक्षण, नितीमत्ता निर्माण करणारे, राष्ट्रीय चारित्र्य, राष्ट्रीय शील, निर्माण करणारे जोपासणारे शिक्षण त्यांना अपेक्षित आहे। शिक्षणाच्या माध्यमातून लोकांना उदरनिर्वाह पण मिळायला हवा ही बाब त्यांनी दुर्लक्षिलेली नाही आणि त्याकरिता शिक्षणाच्या माध्यमातून उद्योगाचे शिक्षण मिळावे ह्यावरही त्यांचा भर आढळतो। संशोधन कार्यावर त्यांचा भर होता। नवनवीन ज्ञानाची निर्मिती होऊन हा समाज नवीन जगाला सामोरे जाण्यासाठी सक्षम असला पाहिजे, त्याच बरोबर ह्या समाजाला धर्माचे रक्षण करण्याची पात्रताही अंगी विकसित व्हायला हवी ही त्यांची धारणा होती। संपूर्ण समाज शिक्षित होणे ही शासनाची जबाबदारी आहे आणि म्हणूनच शिक्षण हे सक्तीचे असावे हा विचार मांडणारे, ज्या काळात “तुम्ही शिका पण स्वराज्य मागू नका” असा राज्यकर्त्यांचा दृष्टीकोन, त्या काळात राष्ट्रीय शिक्षणाची भूमिका आग्रहाने मांडणारे आणि राष्ट्रीय शिक्षणाचा प्रत्यक्ष शाळा महाविद्यालयात राबवणूक करणारे लोकमान्य म्हणजे “आद्य राष्ट्रीय शैक्षणिक क्रांतिकारकच” आहेत।
त्यांचा शिक्षण विषयक विचारांचा गाभा हा राष्ट्रीयत्व हाच आहे। शिक्षणाची परिभाषा करताना लोकमान्य म्हणतात “राष्ट्रीय शिक्षण केवळ लिहिणे वाचणे, व्यापार उदीम उद्योग धंदे, व्यवसाय ह्यापुरतेच मर्यादित नसावे तर त्याला नैतिक मूल्यांचा पाया असावा। ज्या शिक्षणाने चारित्र्य निर्माण होईल, “मी राष्ट्राकरिता मारण्यास तयार आहे” अशी बुद्धी निर्माण होईल तेच खरे शिक्षण होय। राष्ट्र निर्मितीची व राष्ट्रीय पुनरुत्थानाची प्रक्रिया म्हणून ते शिक्षणाकडे बघतात। लोकमान्यांना शिक्षण हे राष्ट्रीय शिक्षण ह्या भूमिकेतून अपेक्षित आहे आणि ह्या दृष्टीकोनातून त्यांनी जी शिक्षणाची ध्येये मांडली ती पुढील प्रमाणे।
लोकमान्यांची शिक्षणाची ही सहा सूत्रे वैश्विक आहेत, सार्वकालिक आहेत। ही पंचसूत्रीच्या आधारे त्यांनी शिक्षणाच्या विविध पैलूवर भर दिला त्यात प्रामुख्याने धर्मशिक्षण, धन्देशिक्षण, औद्योगिक शिक्षण, कृषी शिक्षण, लष्करी शिक्षण, शारीरिक शिक्षण, लोक शिक्षण, स्त्री शिक्षण, समाज शिक्षण, चारित्र्य शिक्षण, संस्कृत शिक्षण अशा विध पैलूंचा विचार त्यांनी केला आहे।
गुरुशिष्य : राष्ट्रीय शिक्षणाच्या दृष्टीकोनातून त्यांनी गुरु आणि शिष्यांचा विचार केला आहे। गुरूची परिभाषा करताना ते म्हणतात की राष्ट्रीय उठावाकरिता जे प्रेरित करतात तेच खरे गुरु होत। तरुण पिढीस राष्ट्रहिताच्या गोष्टी समजावून सांगणे आणि तरुणपणापासूनच तद्नुकुल आचरण करण्याची त्यांच्या मनात प्रवृत्ती निर्माण करणे हेच खऱ्या गुरुचे कर्तव्य आहे। राष्ट्रहिताची उन्नतीची तत्वे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावी ह्या दृष्टीने शिक्षक हा राष्ट्राभक्तच असावा असे त्यांना अभिप्रेत आहे। गुरु जेव्हा धनाला विद्येपेक्षा महत्त्व देतो तेंव्हा तो पोटभीरु ठरतो। ह्यासाठी विद्यार्थ्यांशी बांधिलकी आवश्यक आहे। विद्या हे श्रेष्ठ दैवत आहे। आणि गुरुनी त्याची आराधना करावी। तत्कालीन मुत्सद्दी राज्यकर्त्यांनी जी शिक्षणाची दुरवस्था केली त्याबद्दल लोकमान्यांच्या मनात तीव्र असंतोष होता। शिष्याचे राष्ट्रहित पाहणारा शिक्षक त्यांना महत्वाचा वाटतो। ह्याकरिता त्यांनी आपल्या शिक्षण विषयक लिखाणात अनेक उदाहरणे दिल्याचे आपणास आढळते। राष्ट्र हितापासून दूर नेणारा शिक्षक अपात्र होय असे परखडपणे त्यांनी मत व्यक्त केले आहे। आणि मी केवळ राष्ट्राचा आहे ही धारणा पक्की करून जो राष्ट्राला परिपूर्णतेने जाणून घेतो, राष्ट्राचे सर्वंकष ज्ञान प्राप्त करतो तो खरा विद्यार्थी आहे ही संकल्पना त्यांनी मांडली। गुरु शिष्य संबंधात राष्ट्रहित हा समान दुवा असायला हवा।
लोकमान्यांच्या शिक्षण विषयक विचारात जरी तत्कालीन परिस्थितीचा विचार होता तरी आजही त्यांचे विचार हे सार्वकालिक वाटतात आजही त्यांच्या विचाराची शिक्षण क्षेत्राला नितांत गरज आहे। शिक्षणासमोर आज बरीच आव्हाने आहेत। ह्यात सर्वात महत्त्वाचे आव्हान जर कोणते असेल तर ते म्हणजे मूल्य संवर्धन, ध्येय निष्ठा, प्रखर राष्ट्रभक्ती। अशा परिस्थितीत लोकमान्यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही।
(लेखक शासकीय अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत।)
और पढ़े : लोकमान्य तिलक जी द्वारा लिखित ‘गीता रहस्य’ एक अद्भुत साहित्य कृति
Your email address will not be published. Required fields are marked *
Comment *
Name *
Email *
Website