✍ हणमंत धोंडीराम गायकवाड
भारत ही साधू संत व विचारवंताची भूमी आहे। या पवित्र भूमीत अनेक साधुसंतांचा व विचारवंतांचा जन्म झालेला आहे। त्यापैकीच न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे एक होत।
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा जन्म दिनांक १८ जानेवारी १८४२ या दिवशी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील निफाड या गावी झाला। आईचे नाव गोपिका तर वडिलांचे नाव गोविंद होते। बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या उक्ती प्रमाणे महादेव हे लहानपणापासून कुशाग्र बुद्धीचे होते। त्यांचे शरीर भरदार व डोके मोठे होते त्यांची लहानपणापासून वृत्ती शांत सहिष्णू व उदार होती। या सद्गुणामुळे ते सर्वांना फार आवडत असत। प्राथमिक शिक्षण कोल्हापूर येथे झाले। उच्च शिक्षण मुंबईला झाले। शिक्षण सुरू असताना अवांतर वाचनाची त्यांना फार आवड होती। त्यांनी भरपूर पुस्तकांचे वाचन केले। महाविद्यालयातील जे ग्रंथालय होते त्याचा पुरेपूर त्यांनी वापर करून अनेक ग्रंथांचे वाचन केले। इ.स.१८६२ साली ते बी.ए.च्या परीक्षेत पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले। १८६४ साली एम.ए. परीक्षेत उत्तीर्ण झाले। १८६५ साली कायद्याच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले। मुंबई विद्यापीठाचे ‘पहिले भारतीय फेलो’ म्हणून त्यांची निवड झाली होती। सन १८६६ मध्ये त्याने ओरिएंटल ट्रान्सलेटरच्या जागी सरकारने त्यांची नेमणूक केली। मराठी भाषेत जे ग्रंथ त्यावेळी प्रसिद्ध होत होते त्यांच्यावर अभिप्राय लिहिण्याचे काम ते करत होते। साहित्य, इतिहास या विषयासंबंधी त्यांच्या गाढा अभ्यास पाहून तत्कालीन शासनाने १८६८ साली मुंबईच्या एलफिन्स्टन कॉलेजच्या प्राध्यापक पदी त्यांची नेमणूक करण्यात आली। पुण्याच्या न्याय खात्यात न्यायाधीश म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली। पुढे रानडे यांना मुंबईच्या उच्च न्यायालयात न्यायमूर्तीची जागी नेमणूक झाली। त्या काळात भारतीयांना उच्च न्यायालयातील न्यायमूर्तीचे पद अतिशय दुर्लभ होते। सहसा आपल्या भारतातील लोकांना ते पद देत नसतं पण अशा काळातही त्यांना न्यायमूर्ती पदी बसून त्यांचा गौरवच केला होता।
न्यायमूर्ती रानडे यांचे वैवाहिक जीवन
न्यायमूर्ती रानडे यांचे दोन विवाह झाले होते। एक वयाच्या बाराव्या वर्षी आणि प्रथम पत्नी वारल्यावर दुसरा विवाह एकतिसाव्या वर्षी रमाबाईंबरोबर झाला। वडिलांच्या आग्रहामुळे त्यांनी दुसरा विवाह केला। रमाबाईंसमवेत त्यांचा प्रपंच सुखासमाधानाचा झाला। रमाबाईंनी त्यांच्या उदात्त जीवनाशी समरसता प्राप्त करून घेतली। रमाबाईनी आपल्या पतीच्या देश कार्यास साथ दिली। त्यामुळे न्यायमुर्ती रानडे यांच्या निधनांनतर त्यांनी ‘आमच्या आयुष्यातील काही आठवणी’ ही जी आत्मकथा लिहिली, ती मराठीतील सुंदर साहित्य म्हणून मान्यता पावली। रमाबाईंनी पती निधनानंतर स्त्रियांच्या सेवेस वाहून घेतले। आर्य महिला समाज तसेच लेडी डफरिन फंड कमिटीशी त्यांचा जवळचा संबंध होता। स्त्रियांना व्यावसाय शिक्षण देणाऱ्या संस्था स्थापन केल्या। पुण्यातील ‘सेवासदन’ पुढाकार घेऊन काढली स्त्री शिक्षणाचे कार्य करणाऱ्या संस्थेच्या त्या प्रमुख प्रेरणास्थान होत्या। शासकीय पाठ्य-पुस्तक समितीवरही चार वेळा त्या होत्या तसेच महिला संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते। भारतीय स्त्रीसाठी केलेले त्यांचे कार्य महत्त्वपूर्ण मानले जाते।
राजकीय विचार
न्यायमूर्ती महादेव रानडे यांची इंग्रजांबाबत अशी धारणा होती की, भारतात इंग्रजी सत्तेची स्थापना झालेली आहे। ही ईश्वरी नियोजनाचा भाग आहे। इंग्रजी सत्ता म्हणजे भारताला लाभलेले ईश्वरी वरदान आहे। असे ते समजत असत। इंग्रजांनी भारतात आधुनिक शिक्षण पद्धतीचा पाया घातला आहे। भारतीय जनतेला आधुनिक ज्ञान व विज्ञान यांची ओळख इंग्रजांनीच करून दिली आहे। इंग्रजांच्या सत्तेच्या योगदानामुळे भारतीय समाजात आधुनिकतेचे वारे वाहू लागलेले आहे। प्रबोधनाचे नवे युग सुरू झालेले असे त्यांना वाटे। इंग्रजांनी भारतीय लोकांना आत्मविश्वासाच्या भरपूर संधी उपलब्ध करून दिल्या आहेत। आधुनिक सुख सुविधा केवळ इंग्रजांमुळे मिळलेल्या आहेत। इंग्रजांच्या सत्तेखाली भारतीय जनतेचा विकास होईल असा त्यांचा दृढ विश्वास होता। भारतात सनदशीर राजकारणाचा पाया घालण्याचे काम न्यायमूर्ती रानडे यांनी केले। त्यांच्यावर उदारमत वाद्यांचा प्रभाव असल्यामुळे त्याने घटनात्मक व सनदशीर मार्गाचा स्वीकार केला।
सामाजिक सुधारणा
न्यायमूर्ती रानडे यांच्या मनावर जुन्या परंपरांचा फार मोठा पगडा होता। तसेच भारताच्या प्राचीन इतिहासाचा त्यांना सार्थ अभिमान होता। हिंदू धर्मातील चांगल्या परंपरांचे पुनरुजीवन करून समाज सुधारणा घडवून आणाव्या असे त्यांना वाटे। हिंदू धर्मात अनिष्ट प्रथा नंतरच्या काळात घुसलेल्या आहेत। त्या अनिष्ठ प्रथांना कोणत्याही धर्मग्रंथांचा आधार नाही। अशा अनिष्ट चालीरीती बंद कराव्यात असे त्यांना कळकळीने वाटे। शिक्षणाचा प्रसार व्हावा, स्त्रियांनाही शिक्षण घेता यावे यासाठी त्यांनी मुलींच्या शाळा सुरू केल्या। त्यांनी शिक्षण, समाजसेवा, राजकारण तसेच आर्थिक बाबतीत अमूल्य कार्य केले। समाज जीवनाचा त्यांनी सविस्तर सर्व स्तरावर अभ्यास केला होता। राजकारणाला समाज सुधारणेपासून वेगळे करणे पूर्णपणे अशक्य आहे असे त्यांना वाटे। समाजाची राजकीय किंवा आर्थिक प्रगती करावयाची असेल तर, सामाजिक सुधारणा करणे अत्यंत आवश्यक असे त्यांना वाटे।
प्रार्थना समाज
हिंदू धर्मातील दोषावर प्रार्थना समाजाच्या अनुयायांची टीका केली असली, तरी हिंदू धर्मापासून बाजूला होणे मात्र त्यांना मान्य नव्हते। हिंदू धर्मात राहूनच त्यातील दोष दूर करण्याचा प्रयत्न त्यांनी केला।
३१ मार्च १८६७ रोजी डॉक्टर आत्माराम पांडुरंग, न्यायमूर्ती रानडे, डॉक्टर भांडारकर, आबाजी मोडक इत्यादी मंडळींनी पुढाकार घेऊन मुंबईत प्रार्थना समाजाची स्थापना केली। हा समाज सुरुवातीसपासून एकेश्वर उपासक मंडळी या नावाने ओळखली जात असे। प्रार्थना समाजाची प्रमुख तत्वे खालील प्रमाणे आहेत।
ईश्वर एकच आहे तो निराकार आहे। तोच या विश्वाचा निर्माता आहे।
सत्य, सदाचार व भक्ती हे ईश्वराच्या उपासनेचे मार्ग आहेत।
प्रार्थनेच्या मार्गाने ईश्वराची उपासना करता येते, प्रार्थनेने भौतिक फळाची प्राप्ती होत नाही प्रार्थना ही फक्त आत्मिक उन्नतीसाठीच करावयाची असते।
मूर्ती पूजा हा परमेश्वराच्या उपासनेचा मार्ग आहे।
सर्व मानव एकाच ईश्वराचे लेकरे आहेत। सर्वांनी बंधुभावाने एकत्र राहावे। इत्यादी तत्व प्रार्थना समाजात सामाविष्ठ होती। या समाजा मार्फत जन जागरणाचे काम त्यांनी केले।
भारतीय सामाजिक परिषद
सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी न्यायमूर्ती रानडे यांनी पुढाकार घेऊन भारतीय सामाजिक परिषदेची स्थापना केली। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या १८८७ सालच्या तिसऱ्या अधिवेशनात सामाजिक परिषद पहिल्यांदा भरण्यात आली। काँग्रेसच्या अधिवेशनाच्या मंडपातच तिचे आयोजन करण्यात आले होते। राजकीय प्रश्ना बरोबरच सामाजिक प्रश्नातही लक्ष घालावे असा विचार मांडला होता। सुरुवातीच्या काही वर्षे काँग्रेसच्या अधिवेशनाच्या मडपातच सामाजिक परिषद भरल्या जात होत्या, परंतु १८९५ च्या काँग्रेसच्या पुणे येथील अधिवेशनाच्या वेळी सामाजिक परिषद भरण्यास काही काँग्रेसच्य कार्यकर्त्यांनी कडकडून विरोध। तेव्हापासून भारतीय सामाजिक परिषदा वेगळ्या घेण्यात आल्या। त्यातून सामाजिक सुधारणा घडविण्याचे महत्त्वाचे काम करण्यात आले। मानवाची प्रतिष्ठा उंचावण्यासाठी जाणीव पूर्वक प्रयत्न करणे ही समाज सुधारणेची सुरुवात आहे। आपल्या समाजात संकुचित वृत्ता, जातिभेद, उच्चनीचता, जीवनाविषयी असणारी उदासीनता यासारखे दोष निर्माण झाल्यामळे समाजाची मोठ्या प्रमाणावर अधोगती होत असते यावर मात करण्यासाठी जाणीव पूर्वक प्रयत्न केले पाहिजे। समाजातील दोष प्रयत्नपूर्वक दूर करूनच समाजाची उन्नती करता येते।
हिंदी अर्थकारणाचा पाया घातला
हिंदी अर्थकारणाचा व हिंदी औद्योगिक उन्नतीच्या चळवळीचा पाया घालण्याचे श्रेय न्यायमूर्ती महादेव रानडे यांनाच दिले जाते। त्यांनी हिंदी राजकारणाला अर्थशास्त्रीय विचारांची जोड दिली; स्वदेशीच्या कल्पनेला त्यांनी शास्त्रशुद्ध व व्यावहारिक स्वरूप दिले। स्वदेशीचा प्रचार व प्रसार करण्याचे प्रयत्न केले।
न्यायमूर्ती रानडे यांनी भारतातील दारिद्र्याच्या प्रश्नाचे मूलभूत विवेचन करून येथील दारिद्र्याची कारणे आणि ते दूर करण्याचे उपाय यांसंबंधी अभ्यासपूर्ण विचार मांडले। भारतात शेती व्यवसायावर अवलंबून असलेल्या लोकसंख्येचे प्रमाण प्रचंड आहे। त्यामुळे शेतीव्यवसायावर पडलेला अतिरिक्त ताण, निसर्गाच्या लहरीवर अवलंबून असलेली शेती, देशी उद्योगधंद्यांचा ऱ्हास, शेती व नवे उद्योगधंदे यांत गुंतवणूक करण्यासाठी आवश्यक असलेल्या भांडवलाचा अभाव, लोकसंख्येत होत असलेली प्रचंड वाढ, भारतीयांमधील उपक्रमशीलतेचा अभाव, ही भारताच्या आर्थिक दुरवस्थेची आणि येथील दारिद्र्याची प्रमुख कारणे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते। भारतीय अर्थव्यवहाराला चालना देण्यासाठी आणि त्यास योग्य दिशा प्राप्त करून देण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला पाहिजे, असे त्यांनी सुचविले।
महादेवराव यांच्या काळात ‘लोकहितवादी’ देशमुख, विष्णुशास्त्री पंडित, जोतीराव फुले इ। समाजसुधारकांनी सुधारणेचे आंदोलन सुरू केले होते। त्यात रानडे सहभागी झाले। १८६२ मध्ये त्यांनी इंदुप्रकाश या वृत्तपत्राच्या इंग्रजी विभागात समाज सुधारणेची मीमांसा अनेक लेख लिहून केली। १८६५ साली विधवाविवाहोत्तेजक मंडळाची स्थापना झाली। या मंडळाने एक विधवाविवाह घडवून आणला। परंपरानिष्ठ सनातन धर्मीयांनी शंकराचार्यांच्या अनुमतीने विधवा-विवाहाच्या पुरस्कर्त्यावर बहिष्कार टाकला। त्यामुळे पुष्कळ त्रास सहन करावा लागला। महादेवरावांनी या वादाच्या निमित्ताने वेद, स्मृती, पुराणे व इतिहास यांचा अभ्यास केला। हिंदू धर्मसुधारणेच्या आंदोलनात न्यायमूर्ती रानडे यांनी स्वतःच्या धर्मचिंतनाची भर घातली। धर्मानुभवांची नैसर्गिक योग्यता माणसाच्या अंतःकरणामध्ये आहे। अंतःकरण हे चिंतनशील बनले व विकारांच्या बंधनातून बाहेर पडले म्हणजे आतला विवेकाचा प्रकाश प्राप्त होतो आणि निराकार, पवित्र परमेश्वराची अनुभूति प्राप्त होते। संतांचे आणि धर्मसंस्थापकांचे विचार सर्व सामान्याना देण्याचे काम त्यांनी केले। निराकार, पवित्र, एकाच ईश्वराचा प्रत्यय आणि त्याच्याबद्दलची भक्तिभावना हृदयात व्यक्त होते। म्हणून सगळ्या मानव जातीचा मूळचा शुद्ध धर्म एकच आहे अशी निश्चिती होते, अशी त्यांची धार्मिक, तात्त्विक विचारांची धारणा होती।
समाजकारणाची धुरा आपल्या खांद्यावर घेतल्यानंतर त्यांनी सामाजिक परिषद ही संस्था स्थापन केली। समाजसुधारणेच्या विचारांचा आधार म्हणून निश्चित असे तत्त्वज्ञान त्यांनी मांडले। राजकीय सुधारणा, आर्थिक सुधारणा, धर्मसुधारणा व समाजसुधारणा ही भिन्नभिन्न अंगे परस्परांशी अगदी संबद्ध आहेत, म्हणून समाजजीवनाचा साकल्याने विचार केला पाहिजे असा त्यांचा व्यापक दृष्टिकोन होता। त्यांनी प्रतिपादिले की, वंशभेद किंवा धर्मभेद न मानता मनुष्यामनुष्यांत समानता व न्याय प्रस्थापित करणे, हे नव्या युगातील माणसाचे कर्तव्य आहे। त्याकरिता परंपरेवरच्या अंधश्रद्धेतून आणि धर्मग्रंथांच्या बंधनातून मानवाची बुद्धी प्रथम मुक्त केली पाहिजे। त्याची कर्तव्यनिष्ठा त्याच्या विवेकबुद्धीतून आली पाहिजे। अंध दैववादाऐवजी बुद्धिनिष्ठा रुजविली पाहिजे। मानवा प्रतिष्ठा समतेच्या तत्त्वावर झाली पाहिजे। उच्च असे विश्वनियामक ईश्वरी तत्त्व आणि त्या ईश्वरी तत्त्वाची मानवी हृदयातील शुद्ध प्रेरणा हे सर्व धर्मांच्या मुळाशी असलेले रहस्य होय, असे ते म्हणत। मूर्तिपूजा आणि कर्मकांड यांतून मुक्त होऊन उच्च धर्माकडे मनुष्याच्या विवेकबुद्धीचे आकर्षण वाढले पाहिजे म्हणून राजा राममोहन रॉय यांनी बंगालमध्ये स्थापलेल्या ब्राह्मो समाजाच्या धर्तीवर मुंबईत प्रार्थना समाजाची स्थापना त्यांनी व त्यांच्या मित्रांनी केली। तत्त्वे, उपासनापद्धती आणि विधी यांचे समर्थन करण्यासाठी त्यांनी इंग्लिशमध्ये ‘एकेश्वरनिष्ठाची कैफियत’ अशा शीर्षकाखाली एक निबंध लिहिला। भागवतधर्माचा म्हणजे वारकरी संप्रदायाचा महादेवरावांच्या मनावर प्रभाव खोल उमटला होता। भक्तीचा प्रसार करण्यासाठी प्रार्थना समाजाचा जन्म आहे, असे त्यांनी सांगितले आहे।
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे थोर विचारवंत, राजकीय नेते, सनदशीर राजकारणाचे आग्रही पुरस्कर्ते, समाजकार्यकर्ते अशा विविध नात्यांनी महाराष्ट्रीय जनतेला ज्ञात आहेत। एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात नवे चैतन्य निर्माण करण्याचे श्रेय त्यांनाच द्यावे लागते। राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात- देखील त्यांनी महत्त्वाची भूमिका बजाविली होती।
न्या. रानडे यांचा इतिहासाचाही मोठा व्यासंग होता। त्यांनी ‘मराठी सत्तेचा उदय’ (Rise of the Maratha Power) या ग्रंथांचे लेखन केले। इ.स. १८७८ साली पुणे येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचे ते अध्यक्षही होते। आधुनिक भारताच्या इतिहासात महाराष्ट्रातील समाजसुधारणा चळवळीत महत्त्वाचे स्थान आहे ।
अशा महान समाजसुधारकाचा मुंबई येथे दीर्घ आजाराने दिनांक १६ जानेवारी १९०१ रोजी मृत्यू झाला। भारताच्या नवयुगाचा अग्रदूत गेला म्हणून देशातील सुशिक्षित वर्ग शोकाकूल झाला। तेव्हा भारतातील वृत्तपत्रांमध्ये त्यांच्याविषयी आलेल्या मृत्युलेखांत त्यांची थोरवी गायली गेली। लो. टिळकांनी लिहिलेल्या मृत्युलेखांत असे लिहिले आहे की, थंड झालेला महाराष्ट्र जिवापाड मेहनत करून पुन्हा जिवंत करण्याचे काम प्रथम न्या।रानडे यांनी केले। अशा थोर समाज सुधारकास व विचारवंतास माझा सादर प्रणाम।
(लेखक लातूर, महाराष्ट्र राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक आहेत।)
पुढे वाचा : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक-आद्य “राष्ट्रीय शैक्षणिक क्रांतिकारक”