– सौ. प्रांजली अजय आफळे
अणुरेणिया थोकडा । तुका आकाशाएवढा ।।१।।
या ओळीतच संत तुकारामांचे सूक्ष्मातून प्रचंडाकडे जाणारे समग्र, विस्तृत व व्यापक व्यक्तिचित्र दडले आहे। महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय आणि भागवत संप्रदाय असे दोन संप्रदाय आहेत, त्यात फरक काय? असाही प्रश्न जनसामान्यांना पडतो।
फरक काहीच नाही। वारकरी संप्रदाय श्री विष्णूला केंद्रस्थानी मानतो तर भागवत संप्रदाय श्रीकृष्णाला ।।
संप्रदाय माणसाने निर्माण केले। भक्ती, श्रद्धा, विश्वास यामध्ये मात्र कोणता फरक नाही।
या संत संप्रदायाचे, भक्तीच्या इमारतीचे वर्णन संत बहिणाबाईंनी अतिशय समर्पक अशा अभंगात केले आहे।
ज्ञानदेवें रचिला पाया । उभारीलें देवालया ।।
नामा तयाचा किंकर । त्यानें केला हा विस्तार ।।
जनार्दन एकनाथ । खांब दिला भागवत ।।
तुका झालासे कळस। भजन करा सावकाश ।।
आपल्याला मिळालेल्या मनुष्यजन्म सुखा-समाधानात व्यतीत व्हावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते। पण ती पूर्ण होत नाही आणि सामान्यजनांना हेही समजत नाही की ही सर्व सुखे क्षणभंगुर आहेत। अनंतातून आलेला प्रत्येक जण अनंतात विलीन होणार आहे आणि जाताना कोणीही आपल्याबरोबर काहीच घेऊन जाणार नाही। आपण फक्त कर्म करत राहायचे आहे ही गीतेची शिकवण।। तीच संत सज्जनांनी साध्या सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला।
संत सज्जन हे ज्ञान बरोबरच घेऊन आलेले होते। त्यांना मोक्ष मुक्ती ही मिळालेली होती। पण सामान्यजनांसाठी इहलोकात जन्म घेतलेली ही सर्व संत मंडळी अलौकिक होती।
यादवांच्या अस्ताआधी काही वर्षे आणि नंतर पीडित, शोषित जनता परप्रांतीयांच्या आक्रमणांनी त्रस्त झालेली होती। या जनतेला स्वतंत्र अस्तित्व राहिले नव्हते। अमंगळ भेदाभेद व्यवस्था बोकाळली होती। या भेदाभेदांचा प्रचंड असा त्रास संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांना भोगावा लागला पण ज्ञानेश्वरांसारखा योगी पुरुष अशाच भोंदू जनांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी जन्माला आला होता। सोळाव्या वर्षीच भगवद्गीतेचे संस्कृतातील क्लिष्ट सार सामान्य जनतेपर्यंत पोचवण्याचे अवतारकार्य त्यांनी केले। इथेच या भक्ती संप्रदायाच्या इमारतीचा पाया रचला गेला आणि ह्या इमारतीचा कळस म्हणजे संत तुकाराम।
जे जे या भक्ती संप्रदायाच्या इमारतीचा भाग बनले आहेत ते सर्वच योगी पुरुष आहेत, असामान्य आहेत। संत तुकाराम यांचे जीवन चरित्र बघितले तर पदोपदी या योगीयाचे मनुष्यत्व आणि त्याच वेळी माणसातले अलौकिकत्व अनुभवायला मिळते।
संत साहित्याचे अभ्यासक, संशोधक यांच्या संशोधनानुसार संत तुकाराम अतिशय कोमल मनाचे, मृदू वाणीचे धनी होते आणि त्याउलट आवली नावाची त्यांची पत्नी कर्कशा होती।
लौकिकार्थाने ते एका श्रीमंत घराण्यात जन्मले होते। समृद्ध असे त्यांचे घराणे होते ज्यामध्ये विठ्ठलाची भक्ती परंपरेने चालत आलेली होती। महाजनकी होती।
परंतु काही काळाने अनेक प्रकारच्या अस्मानी सुलतानी आपत्तींना सामोरे जावे लागले। सतरा अठराव्या वर्षी आई वडील गेले ।मोठा भाऊ विरक्ती मुळे तीर्थाटनास गेला।
एका भयंकर दुष्काळाला त्यांना सामोरे जावे लागले। या दुष्काळात त्यांची शेती वाडी, गुरेढोरे सर्व काही गेले। उद्योगधंदे ही बुडाले। लोकांना खायला प्यायला अन्नाचा कणही नव्हता। अशा वेळी संत तुकारामांनी स्वतःच्या तोंडचा घास लोकांना दिला। गरिबांविषयी त्यांना अतिशय कळवळा होता। संकटाच्या परिस्थितीत कर्जदारांचे कर्ज माफ करून टाकले। या दुष्काळात त्यांचा संतू नावाचा मुलगाही गेला। जीवनाची क्षणभंगुरता त्यांना जाणवली आणि मग चिरंतनाचा, शाश्र्वताचा शोध सुरू झाला।
सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ति
रखुमाई चा पती सोयरिया ।।
गोड तुझे रूप गोड तुझे नाम
देई मज प्रेम सर्वकाळ ।।
तुका म्हणे काही न मागो आणिक
तुझे पायी सुख पूर्ण आहे।।
ईश्वरभक्तीतच सर्वकाही आहे हे त्यांना ज्ञात झाले। पण सामान्य जनता लोकातील सुख-दुःखात गुरफटलेली होती।
परकीयांची आक्रमणे सुरूच होती। गुलामगिरीत समाज स्वत्व हरवून बसला होता। मराठा सरदार आपसात भांडत होते। सनातनी लोकांनी चातुर्वर्ण्य व्यवस्था बळकट केली। भोंदू, अंधश्रद्ध माणसांनी समाजमनावर ताबा मिळवला होता। काही धर्मवेड्या माणसांनी वेदांमधील ज्ञानाची मक्तेदारी घेतली होती। बहुजन समाज निद्रेत होता। कर्मकांड देवभोळेपणा यामध्ये साधी भोळी जनता भरडली जात होती।
समाजाच्या या अडाणीपणाचा फायदा घेतला जात होता।
संत तुकारामांनी याच बहुजन समाजाला जागृत करून त्यांच्या भोळ्या समजुती नष्ट करण्याचा प्रयत्न केला। आपल्या अभंगातून जनसामान्यांना उपदेश केला।
गिळुन सांडिले कलेवर । भव भ्रमाचा आकार ।।२।।
सांडिली त्रिपुटी । दीप उजळला घटी ।।३।।
परमेश्वर चिंतनात त्यांना भव्य साक्षात्कार झाला होता। अज्ञानाचा अंधकार निघून गेला होता। तोच साक्षात्कार सामान्यजनांना मिळावा असा या लोककवीचा उद्देश होता। जगात समता नांदावी, भक्तीचा, अध्यात्माचा, माणुसकीचा खरा अर्थ जनांना समजावा म्हणूनच या जगद्गुरुने संस्कृतातील वेदांचा अर्थ प्राकृत सांगण्याचा प्रयत्न केला।आपल्या पूर्वसुरींचा वारसा चालविण्याचा प्रयत्न केला।
अतिशय सोप्या भाषेतील त्यांच्या अभंगानी आजही जनामनावर ठसा उमटवला आहे।
नाही निर्मळ जीवन
काय करील साबण।।
माणसाचे जगणे, वागणे, स्वभाव वृत्ती, खरे-खोटेपणा यावर सडेतोड प्रहार करणारी त्यांची लेखणी आहे।
आज ज्या पर्यावरणा विषय जागृत राहण्याचा संदेश आपल्याला दिला जातो तोच संदेश त्यांनी पाचशे वर्षांपूर्वी आपल्या अतिशय सुंदर अशा अभंगवाणीतून दिला आहे।
वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी
पक्षीही सुस्वरे आळविती ।।
येणे सुखी रुचे एकांताचा वास
आपलाचि वाद आपणासी ।।
माणसाने स्वतःशी संवाद साधावा ।इतरांचे गुणदोष, उणेदुणे न पाहता स्वतःच्या आत्म्याची ओळख करून घ्यावी इकडे तिकडे असे केले तर त्याला खरी शांतता मिळेल आणि पर्यायाने जगही सुखासमाधानात नांदेल अशी त्यांची विचारसरणी होती जी सर्वत्र आपलीशी होत होती।
काही पाखंड, उच्चवर्णीयांना हे पटले नाही। तुकारामांच्या अवतार कार्याची जाणीव त्यांना व्हायची होती।
त्यांना उत्तर देताना तुकाराम महाराज म्हणतात
करतो कवित्व म्हणाल हे कोणी
नव्हे माझी वाणी पदरीची ।।
माझीया युक्तीचा नव्हे हा प्रकार
मज विश्वंभर बोलवितो ।।
बोलविता धनी वेगळाचि ।।
स्वतःला प्रकांडपंडित म्हणवून घेणाऱ्या लोकांनी त्यांचे अभंग इंद्रायणीत बुडवून टाकण्याचे प्रायश्चित्त घेण्यास सांगितले। परंतु हे अभंग तोपर्यंत जनसामान्यांचे झाले होते। त्यांच्या वाणीत एकरूप झाले होते। मनाच्या मुळापर्यंत पोहोचले होते। त्यामुळे जणू काही हे अभंग तरले, इंद्रायणीत बुडले नाहीत असे म्हणता येईल।
खरोखरच तुकारामांचा एकेक अभंग म्हणजे तेजस्वी हिरा आहे। याची प्रचिती नंतर सर्वांनाच आली।
तुकाराम महाराजांच्या लोकप्रियतेची कीर्ती ऐकून छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्याकडे सोन्या मोत्यांचा नजराणा घेऊन आले त्यावेळी तुकारामांनी त्यांना सांगितले की सोने आमच्यासाठी मातीसमान आहे।
शिवाजी महाराज संत तुकारामांच्या व्यक्तिमत्वाने भारले गेले। स्वराज्य, साम्राज्य सोडून तुकारामांच्या चरणी लीन होण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला। त्यावेळी संत तुकारामांनी शिवाजी महाराजांच्या अवतार कार्याची जाणीव त्यांना करून दिली। तुकाराम महाराजांचे समग्र चरित्र अभ्यासले तर असे लक्षात येते की त्यांच्यासारखा असामान्य व्यक्तींना खरोखरच खूप त्रास, संकटे भोगावी लागली आहेत।
ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार ।।
जया अंगी मोठेपणा तया यातना कठीण ।।
या उक्तीप्रमाणे ईश्वराचा अवतार असलेल्या पण मनुष्य रूपात जन्माला आलेल्या प्रत्येकाच्या वाट्याला हे भोग आलेले आहेत। प्रत्यक्ष श्रीकृष्ण देखील त्यातून वाचलेले नाहीत। अजून एक गोष्ट म्हणजे कोणत्याही अलौकिक व्यक्तीची थोरवी ही सामान्यजनांना चमत्काराशिवाय पटत नाही म्हणूनच त्यांचे जीवन चमत्कारांनी भरून टाकण्याचा प्रयत्न झालेला दिसतो।
संत तुकाराम महाराजांच्या गाथा इंद्रायणी नदीने बुडवल्या नाहीत ; त्या तरल्या।
किंवा संत तुकारामांचे सदेह वैकुंठ गमन झाले असे चमत्कार सगळ्यांनाच माहीत आहेत।
संत तुकाराम हे शेवटी नाहीसे झाले, त्यांचा देह कोणाला दिसू शकला नाही किंवा त्या देहाचे सामान्य व्यक्तीप्रमाणे दहन झाले नाही।
संत तुकारामांना नेण्यासाठी स्वर्गातून पुष्पक विमान आले। प्रत्यक्ष देव त्यामध्ये बसून आले होते; ज्यांचे दर्शन समस्त देहूकरांना झाले अशी एक दंतकथा प्रसिद्ध आहे।
त्याविषयी अभ्यासकांच्या मते अनेक वाद विवाद आहेत।
या गोष्टीचा अर्थ असा सांगता येईल की, संत तुकारामांनी इतके मोठे कार्य केले आहे की त्यांच्यामुळे माणसातील ईश्वराचे दर्शन सामान्य जनांना घडले।
खरोखरच संत तुकाराम सतराव्या शतकात जन्माला आले। पण आज पाचशे वर्षांनंतर देखील त्यांचे अभंग जनमानसात रुजले आहेत। त्यांची शिकवण आजही आपल्याला आपल्यातील देवत्वाचा शोध घेण्यास प्रवृत्त करते यातच सर्व काही आले।
तुका म्हणे आता । उरलो उपकारापुरता ।।४।।
समस्त मनुष्य जातीवर या संत सज्जनांनी जे उपकार करून ठेवलेले आहेत, त्यामुळेच अजूनही समाज रसातळाला गेलेला नाही आणि हे विचार असेच पुढील पिढीपर्यंत पोहोचले तर समाज नक्कीच भवसागर तरुन जाईल आणि हे अभंग गात राहील।
हेचि दान देगा देवा
तुझा विसर न व्हावा
गुण गाईन आवडी
हीच माझी सर्व गोडी
न लगे मुक्ती धनसंपदा
संत संग देई
सदा संत संग देई सदा
तुका म्हणे गर्भवासी
सुखे घालावे आम्हासी…
यही भी पढ़ें : संत तुकाराम का जीवन दर्शन