राष्ट्र गुरु समर्थ रामदास स्वामी

 – सौ. ममता गद्रे

 

।। ‘जगामधे जगमित्र । जिव्हेपासी आहे सूत्र’ ।।

“ज्ञानदेवे रचिला पाया । कळस झळके वरी  तुकयाचा

त्यावरी भगवा फडकतो । शिव समर्थ रामदासांचा ।।”

असे महाराष्ट्रातील भक्ती मंदिराचे वर्णन करता येते। प.पू.राणूबाई व सूर्याजीपंत ठोसर यांच्या पोटी, शके १५३० मध्ये जांब गावी ऐन बारा वाजता मंदिरा मंदिरातून राम जन्माचा गुलाल उधळला जात होता तोच क्षण साधून राणुबाईंना पुत्ररत्न झाले। त्याचे नांव ‘नारायण’ ठेवले। हेच पुढे ‘राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी’ या नावाने विख्यात संत झाले।

गायत्री, सूर्य,प्रभू श्रीराम भक्ती व हनुमन्ताची बलोपासना अनेक पिढ्यांची ही पुण्याई होती। हीच उपासना, प्रखर तपश्चर्या करुन बाल नारायणाने रघुनाथ कृपा प्राप्त करून घेतली। नारायण ते रामदास असा घनीभूत वैराग्याचा पुतळा, म्हणून समाज मार्गदर्शक, संप्रदाय व कार्यकर्ता प्रवर्तन, मानसशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ञ, अशा अनेक पैलुतून भगवान श्रीरामाचे गुण समाजासमोर प्रगट करणारे श्रीसमर्थ रामदास हे थोर संत होत। मनाचे श्लोक, दासबोध, आत्माराम, उपदेशापर रचना अशा त्यांच्या अपार साहित्यातून ‘पारदर्शी  जीवन भाष्य’ आम्हाला लाभले ही महाराष्ट्राला लाभलेली थोर देणगी आहे।

समर्थ बुद्धी प्रामाण्य मानणारे, प्रयत्नाला देवतुल्य श्रेष्ठत्व देणारे, ज्ञानपूजक, आचार्यांच्या अद्वैताचा पुरस्कार करणारे विवेकी, तपस्वी, सावध, लोकसंग्रहासाठी मौलिक विचारधन देणारे, आधी केले मग सांगितले असे श्रीरामदास स्वामी त्यांच्या साहित्यात सापडतात।

“सामर्थ्य आहे चळवळीचे । जो जे करील तयाचे ।

परंतु तेथे भगवंताचे । अधिष्ठान पाहिजे ।”

‘शरीर परोपकारी लावावे। बहुतांच्या कार्यास यावे’ अश्या अनेक शुभाषितांपैकी एक शुभाषित म्हणजे “जगामधे जगमित्र। जिव्हेपासी आहे सूत्र। कोठे तऱ्ही सत्पात्र। शोधून काढावे” ही शिकवण नामक दशकांतील (स.१९/२ ओ.१९) दासबोधात आहे। दुर्लभ नरदेहाचे सार्थक मोक्ष प्राप्ती हेच आहे। त्यामुळे समर्थांचा संपूर्ण उपदेश प्रपंच व परमार्थाची सुंदर सांगड घालणारा आहे। चिंतनासाठी घेतलेली ओवी जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करून ध्येयापर्यंत पोचवणारी आहे।

‘जग’ ही संकल्पना खूप भव्य आहे। पण जगाच्या संकल्पनेत प्रत्येकाचे एक मर्यादित (विश्व) जग आहे। एक छोटी मुंगी तिचे सुद्धा जग आहे। त्यामुळे प्रत्येक व्यक्ती ज्या चौकटीत जीवन जगते तेवढे तिचे जग मर्यादित असू शकते। त्यामुळे माझ्यासारख्या छोट्या सामान्य जगापासून वर्तमानात पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंतच्या विशाल जगाचा एवढेच नव्हे तर ‘भेदीले शून्य मंडळापर्यंत’ निर्गुण निराकार वा सगुण साकाराची ‘प्रचिती घेण्यचे सामर्थ्य’ या ओवीच्या शब्दात आहे। शब्दांचा विवरण करणारा हा समास आहे। समासाच्या प्रारंभी ‘मग बोलिले लेखन भेद। आता ऐका अर्थभेद। नाना प्रकारीचे संवाद। समजोन घ्यावे।। असे समर्थ सांगतात। समर्थांचा कालखंड अस्मानी सुलतानीने थैमान घातलेला असा होता। ‘आनंदवन भुवानाचे’ स्वप्न सत्यांत उतरवण्यासाठी राष्ट्र उभारणीचा उद्योग करावा लागेल। देव देश धर्मासाठी जीवन पुष्प अर्पण करणाऱ्या श्रेष्ठ दर्ज्याच्या व्यक्ती हव्या ही संकल्पना घेऊन त्यांनी संस्कारांची पाठशाळा देशभर सुरु केली। महंत लक्षण, उत्तम पुरुष लक्षण, निस्पृह लक्षण, सदेव लक्षण अशा समासातून संस्कार घेऊन बाहेर पडलेले कल्याण स्वामी, उद्धव स्वामी, वेणाबाई इ. असंख्य तरुण बाहेर पडले अश्यांना समर्थांनी महंत ही पदवी दिली। श्रीसमर्थ दास असूनही स्वामी आहेत। त्यांचे सांगणे, बोलणे, विचार कृतीच्या परीसावर घासून उजळले। ‘उद्वेग वाटतो जीवी। आता जावे कुणाकडे’ अशा परिस्थितीतून  ‘उदंड जाहले पाणी’च्या सुस्थितीत परिणत करतांना त्यांनी शिष्यांना, लोकांना खूप शिकवले। त्यांची शिकवण स्थळ काल निरपेक्ष आहे।

प्रचाराचे तंत्र आणि मंत्र समर्थांनी उपरोक्त ओवीतून धर्मकार्यासाठी माणसे जोडण्यासाठी ह्या मंत्ररूप ओवीतून जे सांगितले ते आजही जसेच्या तसे प्रत्येक क्षेत्रात उपयुक्त आहे। त्यांच्या शिकवणीत द्रष्टेपण आहे।

‘नाना जनांचे हृदये। मृदु शब्दे बोलत जावे।।’ मित्र जोडायचे तर ‘बाष्कळपणामध्ये बैसो नये।’ प्राणीमात्र बोलवावा आत्मपणे।।१७।। सकळाचे हृदय निववावे। अशी पथ्य सांगून ह्या जगात जगमित्र होण्यासाठी व मित्र जोडण्यासाठी। दोन्हीचे रहस्य वाणीमध्ये आहे। ह्या मैत्रीतून सत्पात्र व श्रद्धावंत शोधून काढावेत असा संदेश या दशकांत समर्थ देतात। मुळातून हे समास अभ्यासावे। लोकमान्य टिळक म्हणतात ‘जगात उत्कृष्ठ ग्रंथ गीता व त्याचे प्रचारक आहेत रामदास’ त्याची प्रचिती या ओवीत येते। भ. श्रीकृष्ण सांगतात, जे समर्थ सांगतात।

“अनुद्वेग करं वाक्यं सत्यं  प्रियहितं च यत् ।

स्वाध्यायाभ्यसनं चैव वाड।मयं ताप उच्चते ।।” १७/१५

बोलावे कसे हे सांगणाऱ्या असंख्य ओव्या, श्लोक इ. त्यांच्या वाड। मयात विखुरलेले आहेत। सर्व व्यवहार उत्तम व्हायचा असेल तर त्याचे सूत्र जिव्हेपाशी आहे। त्यासाठी सात्विक आहाराचा  समर्थांनी आग्रह केला आहे। कुणाला उद्वेग वाटणार नाही असे शब्द उच्चारावे। ते सत्य, हितकर असावे। वाणीचे तप करण्यासाठी प्रत्येकाने उत्तम सवयी लावून घेण्याचा आग्रह करावा।

जगातील अनेक पक्षी प्राणी बोलतात। पण काश्मीरचा कावळा व चेन्नईचा कावळा एकच भाषा बोलतो। पण मनुष्याला, इतर प्राण्यांहून जिव्हा शक्ती बुद्धी अधिक असल्याने अगणित भाषा बोलण्याची दैवी देणगी मिळाली आहे। प्रिय व नम्र वाणीच्या तपाने माणुस संतपदी पोचतो। जीवनात यशस्वी व्हायचे तर त्याचे सूत्र जिव्हेपाशी आहे।

आत्मा जसा सर्व व्यापक असतो तसा समर्थांचा महंत समाज जीवनाची सगळी क्षेत्रे व्यापणारी कार्य पार पाडतो। आज याच आधाराने स्वयंसेवी संघटनांचे कार्यकर्ते जगमित्र होऊन निःस्पृहपणे कार्य करतांना दिसतात। अशा यशस्वी कार्याचे सार, ‘जगामधे जगमित्र। जिव्हेपाशी आहे सूत्र।’ या ओवीत आहे।

उपदेश व मैत्री यांच्या साह्याने दुर्जनांना सुद्धा सत्कार्याच्या प्रवाहात ओढणे व सज्जनांची शंकानिवृत्ती करून त्यांना आपल्या कार्यात जोडून घेणे ही दुहेरी कामगिरी करण्यासाठी शब्दांनीच मैत्री वाढते।

‘कोण कोण राजी राखले। कोण कोण मनी भंगले।

क्षणाक्षणा परिक्षिले। पाहिजे लोकी।।’

असे समर्थ सांगतात। सामान्य दुनियेत तोडणे सोपे आहे। जोडणे अवघड! त्यात ही दोन्ही कामे एकच जीभ करते। तिला योग्य वळण द्यायचे तर चांगल्या संस्कारात सूत्रबद्ध करावे लागते। ‘घेई घेई माझे वाचे। गोड नाम विठोबाचे।’ (तुकोबा) ‘हरी मुखे म्हणा। हरी मुखे म्हणा।’ (ज्ञानोबा) ‘वद वद जिव्हे एकच नाम। श्रीराम जय राम जय जय राम।’ (श्रीसमर्थ) अशी सूत्र संतांनी आचारली। त्यामुळे ज्ञानोबांचा समाजाने एवढा छळ केला तरी त्यांच्या वाणीने एकही अनुद्गार काढला नाही। उलट ‘कां नादब्रह्म मुसे आले। की गंगापय उसळले। की पतिव्रते आले वर्धक्य जैसे। तैसे साच आणि मावाळ। मितले परि सरळ। बोल कैसे कल्लोळ। अमृताचे।। अशी अमृतातेही पैजा जिंकणारी त्यांची वाणी समर्थांचे सूत्र सांगणारी होती। संत सोयरोबा देखिल सांगतात की ‘विवेकाची ठरेल ओल। ऐसे बोलावे की बोल।’ समाजातील सर्व स्तरात कार्य उभारणीसाठी मैत्री करायची तर माणसातल्या दोषांचा पाढा न वाचता समर्थ  सांगतात “वेड्यास वेडा म्हणू नये। वर्म कदापि बोलो नये।” “अडले जाकसले जाणावे। यथानुशक्ती कामास यावे। मृदु वाचने बोलत जावे। कोणी येकासी”।। १०/१०/६ प्राणी मात्रास मिळवूनि घ्यावें। बऱ्या शब्दे।।

धर्माधिष्ठित कार्यरूपी समाज रथ चांगला चालवायचा तर मधुर वचनाचे वंगण हवे। कार्याबद्दल श्रद्धा प्रेम नसणारी माणसे कठोर शब्द बोलून कार्यनाश करतात। शिव्या, अपशब्द स्वतःचे व दुसऱ्याचे नुकसान करतात। ‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्नें’ असे तुकोबा सांगतात। ‘कर्कश भुंकती श्वाने। तैसे वाक्य करू नये।’ समर्थ  ही ओवी आचरणात आणायची ती प्रथम माझ्या पासून प्रारंभ करणे समर्थांना अभिप्रेत आहे। फार मार्मिकपणे ते सांगतात ‘पेरिले ते उगवते। उसणे द्यावे घ्यावे लागते।’

‘वर्म काढिता भंगते परांतर। म्हणून बाष्कळपणाची वटवट करू नये।’ “जैसे बोलणे बोलावे। तैसे चालणे चालावे। बरे बोलता सुख वाटते। हे तो  प्रत्यक्ष कळते। मग कठीण शब्द बोलावे ते। काय निमित्त।” जो बोलण्याप्रमाणे करून मग बोलतो त्याच्या बोलण्याने समाज प्रभावित होतो।

जगमित्र असणारे रामदास स्वामी स्वतःबद्दल फार काही बोलत नाहीत। पण (१४/१/२) एका ओवीत त्याचे दर्शन घडते। ‘सोपा मंत्र परी नेमस्त। सोपे औषध गुणवंत। साधे बोलणे सप्रचित। तैसे माझे।’

संभाजी राजांना समर्थ पत्रात सांगतात, “शिवरायांचे आठवावे रूप …….शिवरायांचे  कैसे बोलणे। शिवरायांचे कैसे चालणे। सलगी देणे। कैसे असे।” यामुळे छत्रपतींना जीवाभावाचे मित्र जोडता आले। भ.प्र.रामांची व सुग्रीवाची मैत्री आदर्श होती। ‘तुझ्या सारखा मित्र कुठे सापडणार नाही असे श्रीराम म्हणतात। भ.श्रीकृष्ण व सुदामा, भक्तसखा अर्जुन ही मैत्रीची उदा। वाचली तर मती कुंठित होते। श्रीसमर्थांनी असा जगमित्र कुठे पहिला? बघू या भ.प्र.श्रीरामांचा सूर्य हा मित्र आहे। बारा सूर्यनमस्कारात त्याचे नांव ‘ॐ मित्राय नमः’ आहे। सामार्थांनी बालवयात ऋषी सारखी बारा वर्षे प्रखर सूर्योपासना केली। ज्या गायत्री पुरश्चरणाने त्यांची वाणी पवित्र झाली त्या तपाने समर्थांची सूर्याशीच मैत्री जमली। सूर्याशी मैत्री ही हितकारक कर्माकडे माणसाला प्रवृत्त करते। म्हणून सूर्याशी मैत्री करा। सूर्य पृथ्वीवरील खारट पाणी घेतो व पृथ्वीला जणू वाईट वाटू नये म्हणून ते गोड करून वर्षाव करतो। कृष्णाने सुदाम्याचे पोहे घेतले अन सुवर्ण नगरी दिली। हा सूर्याचा आदर्श कृष्णाने आचरला। तो आम्हीही आचरावा हीच यात शिकवण आहे।

सूर्याची नम्रता थक्क करणारी आहे। तो शांतपणे उगवतो। शांतपणे दरवाजा बाहेर, खिडकी बाहेर उभा राहतो। आपण दारे उघडली तरच तो किरणांच्या रूपाने प्रसन्नपणे आत येतो। आपण दरवाजा उधडला नाही तर कसलाच गोंगाट न करता शांतपणे बाहेर उभा राहतो। जगात संस्काराचा प्रकाश पसरवण्यासाठी जाणाऱ्या कार्यकर्त्याला हा श्रेष्ठ मार्गदर्शक मित्र आहे।

आता मनाच्या श्लोकात समर्थ काय सांगतात ते बघू। ‘जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा’ या पालूपदाच्या (१०) श्लोकात श्रेष्ठ रामभक्त बोलतो कसा? तर ‘सदा बोलण्यासारखा चालताहे’ (४९) ‘सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा’ (५१) ‘न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा।’ संत अशा आर्जवी शब्दात बोलतात। त्याचे बोलणे विवेकाच्या चाळणीतून चाळून घेतलेले असते। ते त्रिवार सत्यच बोलतात।

एकानी स्वामी विवेकानंदांना विचारले तुमचे जीवन चरित्र सांगा? ताबडतोप स्वामीजी म्हणतात, ‘आमार जीवन, आमार वाणी’ जसे वागलो तसे बोललो। तेच माझे आत्मचरित्र! समर्थ ह्याहून वेगळे सांगत नाही। महापुरुषांची चरित्र तिथीत बंदिस्त करता येत नाहीत। दासबोध व आत्माराम ह्या वाड। मयमूर्ती रूपाने आपल्यात ते उपस्थित आहे। जिव्हेपाशी मैत्रीचे सूत्र असणाऱ्या जिभेची महती एका कथेतून (ऐकली) वाचली की विषय स्पष्ट होईल। खलील जिब्राल हा उत्कृष्ट स्वैम्पाकी होता। एकदा हॉटेल मालकाने पार्टीसाठी त्याला उत्तम पक्वान्न करायला सांगितले। तेव्हा त्याने बोकडाच्या जिभेच्या पदार्थाने थाळी सजवून टेबलावर ठेवली। पाव्ह्ण्यांनी त्याला विचारले, ‘तू पक्वन्नासाठी जीभ का निवडली?’ ‘तो म्हणतो, ‘जीभेमुळे उत्तम वक्ता, गायक, इ. होता येते। जीभेमुळे सुसंवादातून मैत्री जोडली जाते, ती जीभ!’ उत्तर ऐकून सागळे खूष! दुसरे दिवशी आणखी कुणी येणार तेव्हा मालक सांगतो, “आज अगदी नगण्य वस्तूपासून पदार्थ कर।” पण त्याने पुन्हा जीभेपासूनच पदार्थ बनवला। त्याला विचारले, ‘हे काय आज पुन्हा जीभेचाच पदार्थ का?’ तो म्हणतो, “जीभेसारखा खतरनाक अवयव दुसरा नाही। कारण तिच्यामुळे दुरुस्त न होणाऱ्या जखमा होतात। नाते, मैत्री तुटते। तिच्या चोचल्यातून अपेयपान व त्यातून कुटुंब उध्वस्त होते। महाभारत घडते। अशी जीभ चांगली तितकीच वाईट।”

म्हणून श्रीसमर्थांच्या पावन भिक्षेचे स्मरण करून आपण भ.प्रभू श्रीरामांना मागू एकाच मागणे,

कोमल वाचा दे राम । उत्तम गुण मज दे रे राम ।

बहुजन मैत्री दे रे राम । शब्द मनोहर दे रे राम ।

।। श्रीराम जय राम जय जय राम ।।

(लेखिका श्रीसार्थ सेवा मंडळ, नागपूर आणि श्रीशाक्तीपीठ, रामनगर, नागपूर या दोन संस्थांमध्ये कार्यरत आहे। संत साहित्यावर लेखन व कीर्तन प्रवचनाचा छंद जोपासला आहे।)

यह भी पढ़ें : शक्ति, भक्ति एवं संगठन का अद्भुत संगम – समर्थ रामदास स्वामी

Facebook Comments

One thought on “राष्ट्र गुरु समर्थ रामदास स्वामी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *