मातृभाषा मराठी चे महत्त्व


– सौ. प्रांजली जोशी

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी

एवढ्या जगात माय मानतो मराठी

श्रेष्ठ  कवी सुरेश भट यांनी आपल्या काव्यात मराठी या भाषेची महानता व्यक्त केली ती सार्थ आहे. आम्हा महाराष्ट्रीयांची ‘मातृभाषा’ ही मराठी आहे. ही भाषा आमची ‘आई’. माता बोलते म्हणून नाही तर ती आमची संस्कृती आहे. ही ‘मराठी’ मातृभाषा आमच्या मनामनात, रोमारोमात भिनलेली आहे. या भाषेची स्पंदने उराउरात भरलेली आहेत.

का नसावा आम्हाला आमच्या मातृभाषेचा अभिमान! आमची भाषा अमृताशी पैजा जिंकणारी आहे. तिला एक इतिहास आहे. त्या इतिहासाचे पुरावे आहेत. आमची मातृभाषा नदीसारखी प्रवाही आहे. काळाच्या ओघात स्वतःला बदलवणारी आहे. नीरक्षीर विवेकबुद्धीने इतरांना सोबत घेऊन चालणारी आहे.

आमची ही मातृभाषा मराठी कोणत्या काळापासून आहे हे बघण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे मूळ स्वरूप 11व्या शतकात बघायला मिळते. मराठीत शके 1110 मध्ये ‘मुकुंदराज’ यांनी लिहिलेला ‘विवेकसिंधु’ हा ग्रंथ त्याची साक्ष देतो. म्हणजे ही भाषा फक्त बोलली जात नव्हती तर तिच्यातून लिहिलेले ग्रंथ आहेत. म्हणजे त्या काळात त्यांची ‘लिपी’ तयार होती. अर्थात त्या काळातच निरनिराळ्या आवाजांच्या किंवा ध्वनीच्या सांकेतिक खुणा ठरविल्या होत्या ज्या खुणांना मराठीत ‘अक्षर’ म्हणतात. मातृभाषेतील आपले बोलणे नष्ट न होऊ देता दीर्घकाळ टिकून राहावे म्हणून ‘अक्षर’ राहण्यासाठी लिपीत लिहून ठेवण्याची सोय होती. क्षर म्हणजे नश्वर, नष्ट होणारे. अ क्षर म्हणजे नष्ट न होणारे. याचे दाखले आज आपल्याला 21व्या शतकातही उपलब्ध आहेत इ.स. 1283 मधे लिहिलेले महानुभव पंथाचे ग्रंथ लीळाचरित्र, 1288 मधे श्री. संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी, 13व्या शतकातील, 16व्या शतकातील संत वाङमय आणि बरेच ग्रंथ, पुराणादि आपल्याला मराठी भाषेच्या अस्तित्वाची, तिच्या सुख-समृद्धीची जाणीव करून देते. शिलालेख, ताम्रपट, आज्ञापत्रे, बखर, तहनामे राजीनामे, फर्माने अशी अनेक साधने आपल्या मराठीच्या इतिहासाची साक्ष देणारे साक्षीदार आहेत. मराठीला खरे वैभव प्राप्त झाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात. आणि आज ती जिवंत आहे ती ही शिवाजी महाराजांमुळेच असे म्हणणे वावगं होणार नाही. म्हणून आपण असेही म्हणू शकतो की –

आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी

पिलापिलात आईकडून जन्माबरोबर भाषा ही मिळते. आईची भाषा ती तिच्या पिल्लांची भाषा. म्हणजेच मातृभाषा असेच नाही तर त्या भाषेबरोबरच आपल्याला आईची संस्कृती, ती ज्या समाजात राहते तो समाज, तिचा आहार-विहार, तिची ओळख ती तिच्या पिल्लांची ओळख बनते. इतके महत्त्व आपल्या मातृभाषेला आहे. महाराष्ट्राबद्दल बोलायचे तर मराठीला आहे. आमची मातृभाषा आमची ओळख आहे.

आपल्या/ मानवाच्या आयुष्यात भाषेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणूनच ती 11व्या शतकापासून 21व्या शतकापर्यंत जिवंत आहे आणि ती अशीच ‘यावत् चंद्रदिवाकर’ राहणार आहे. भाषा नदीसारखी प्रवाही आहे असे म्हणतो त्याचे कारण तसेच नदी ज्याप्रमाणे कोणतीही अडचण येवो, अडथळे येवो, त्याठिकाणी न थांबता पुढे पुढे वाहात जाते, आजूबाजूचा परिसर समृद्ध करीत जाते असेच भाषेचे आहे.

महाराष्ट्राची मराठी भाषा ही तशीच आहे. ती महाराष्ट्राची संस्कृती आणि संस्कार एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे, दुसऱ्या पिढीकडून तिसऱ्या पिढीकडे अशी अव्याहत वाहत नेत आहे. तिच्या भोवतालचा परिसर समृद्ध करीत आहे.

या संस्कारक्षम मातृभाषेचे महत्त्व कालातीत आहे. व्यक्ती आपल्या मनातल्या भावना, आपले विचार, आपली मते आपल्या मातृभाषेतूनच प्रभावीपणे मांडू शकते. त्या भाषेची भाषिक कौशल्ये आत्मसात केली असतील तर उत्तम प्रकारे मांडेल नाही तर आपल्या यथाबुद्धी, मोडक्या तोडक्या किंवा बोली भाषेत प्रगट करू शकेल ते ही मातृभाषेतच.

त्याची विचारशक्ती, कल्पनाशक्ती, सृजनात्मकशक्ती भाषेच्या नव्हे मातृभाषेच्या अभ्यासाने पूर्ण विकसित होऊ शकते. पण त्याचा पाठपुरावा, त्याचे संस्कार, बालवयापासून, मी तर म्हणीन की आईच्या गर्भात असल्यापासून झाले पाहिजेत. मग ती भाषा बोलीभाषा असली तरी चालेल.

महाराष्ट्रात अनेक बोलीभाषा बोलल्या जातात. उदा. द्यायचे तर वर् हाडी, अहिराणी, वारली, कोरकू, माडिया, खानदेशी, चंदगडी, झाडी, पोवारी, मालवणी, कोहळी अशा एकूण 58 ते 60 च्या वर बोलीभाषा आहेत. या बोलीभाषा त्या त्या जाती जमातींची संस्कृती, रुढी रीतीरिवाज, त्यांची कला, त्यातील जिवंतपणा, सौंदर्य, रसरशीत जीवन जगण्याची कला या पिढीकडून पुढच्या पिढीकडे संक्रमित करीत असतात आणि अशा या रसाळ बोलीभाषा प्रमाण भाषेला समृद्ध आणि संपन्न करीत असतात. बारा कोसावर बदलणाऱ्या भाषेचे स्वरूप कसेही असो त्यातील गोडवा अवीट आहे हे नक्कीच.

जन्मापासून आपल्याला जी भाषा, संस्कार मिळतात ते जन्मभर पुरणारे असतात. या भाषेमुळे आपण दैनंदिन व्यवहार सुकरतने करू शकतो. समाजात वावरू शकतो तसेच संस्कृतीशी जोडलेले राहू शकतो. आपली नाळ त्या मातृभाषेशी, त्या जन्मदात्रीशी आणि त्या मातृभूमीशी सतत जोडलेली असली पाहिजे. म्हणून स्वामी विवेकानंद म्हणतात “ज्या देशातील लोक स्वतःच्या आईच्या, स्वतःच्या मातृभूमीच्या आणि स्वतःच्या भाषेचा गौरव करणारे असतात तो देश संपन्न आणि समृद्ध राहून गौरवशाली होऊ शकतो”.

प्रत्येक राज्याची आपली एक मातृभाषा असते. ज्यांची संस्कृती संगीत, कला, अन्नधान्य, आहार-विहार, लोककला, राहाणीमान यांचे प्रतिबिंब त्यांच्या मातृभाषेतून इतरांना कळणार नाही पण ज्यांना कळतात त्या गोष्टी त्यांनी त्याचा सन्मान केला तर इतरही तो आपसूकच करतात.

मराठीची ग्रंथसंपदा समृद्ध आहे. 11व्या शतकापासून ही ग्रंथपरंपरेची दिंडी अव्याहतपणे सरस्वतीच्या मंदिरापर्यंत वारी करीत असते. जीवन जगताना मार्गदर्शन करणारा ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ, संत तुकाराम, नामदेव, चोखामेळा, मुक्ताबाई, जनाबाई सारख्यांचे अभंग समाजप्रबोधन 13/16 व्या शतकापासून अव्याहतपणे करीत आहेत. कारण ते अभंग अ भंग आहेत. पु. ल. देशपांडे, कुसुमाग्रज, व. पु. काळे, वि. स. खांडेकर, ना. सी. फडके यासारखे असंख्य लेखक, बा. भ. बोरकर, कवी यशवंत, माधव ज्युलियन, सुरेश भट यासारखे नामवंत प्रसिद्ध कवी, नाटककार, समीक्षक, शास्त्रज्ञ जयंत नारळीकर, डॉ. अनिल काकोडकर यांसारखे मराठी मातीतले विज्ञान कथा लिहिणारे, चि. वि. जोशींसारखे विनोदी वाङमय लिहिणारे, विजय तेंडुलकर, रमेश मंत्री, नारायण सुर्वे डॉ. आंबेडकरांसारखे रत्नप्रभावाळीतले दैदिप्यमान हिरे मातृभाषेचे पूजक बनले. भक्त बनले. त्यांनी आपल्या लेखनाद्वारे आपल्या मातृभाषेची पूजा केली.

भाषा लक्ष्य शिकाव्यात परि लक्ष मातृभाषेकडे असावे.

आपल्या मराठी भाषेत बालसाहित्य, बालनाट्य, बालकविता यांचे भांडार ओतप्रोत भरलेले आहे. पण आपले लक्षच नाही. आपण लक्षातच घेत नाही मातृभाषेचे महत्त्व. मराठीचे महत्व. आईच्या मांडीवर असल्यापासून आपली आपल्या मातृभाषेची ओळख होते. अडगुलं मडगुलं, वरण-भात-भाजी-पोळी कडढीची पाळ फुटली…. फुटली…. म्हणत खुदुखुदु हसणारे बाळ त्यातला नाद, लय ओळखायला लागते. चिऊ-काऊच्या गोष्टी ऐकत 3/4 वर्षाचे होत नाही तर आम्ही त्याला पुढे मराठीत काही शिकवायच्या ऐवजी Ba…ba…black sheep नाहीतर “जॉनी जॉनी यस पप्पा” शिकवितो. जीभेवर चांगले संस्कार करणारे संस्कृत श्लोक, मराठी बडबड गीते सोडून इंग्रजीच्या जाळ्यात अडकवतो जो आज नेटवर्कमधे पुरता गुरफटला आहे. का नाही आम्ही मराठीत त्याला पूर्ण प्राथमिक शिक्षण देऊ शकत. वयाच्या कोवळ्या वयात त्याला ‘काऊ’ म्हणजे ‘कावळा’ सांगणार्‍या आईपासून, मातृभाषेपासून तोडून ‘काऊ’ म्हणजे ‘गाय’ शिकवणाऱ्या मॅडम जवळ ठेवून/शिकवायला नेऊन गोंधळात टाकतो. इंग्रजीमधुन शिक्षण द्यायला सुरूवात केली की त्याची विचारशक्ती, कल्पनाशक्ती, सृजनक्षमतेला खीळ बसते आणि सारी बुद्धी भाषांतराच्या विळख्यात अडकते. सारी शक्ती पणाला लावून तो इंग्रजीत शिकलेल्या भाषेचा दैनंदिन जीवनात भाषांतर करून करून त्रस्त होतो. वास्तविक पाहता प्रत्येक राज्याची वेगवेगळी मातृभाषा असली तरी ती आपल्या पूर्वजांनी समृद्ध, संपन्न करून ठेवली आहे.

मराठीतही शब्दकोश, विश्वकोश, व्युत्पत्ति कोष आहेत पण लक्षात कोण घेतो? जर्मन मधला एक बालक आपल्या मातृभाषेत गणितात प्रगती करू शकतो ते ही इंग्रजीशिवाय. इटली मधला इटालियन इटलीच्या मातृभाषेत पाढे म्हणतो. स्पेनचा बालक स्पॅनिश भाषेत प्रगती करतो इंग्रजी सोडून. मग आपल्याला मराठीत पाढे पाठ करायची लाज का वाटावी. आपणाकडेही मराठीत वैदिक गणित आहे. पाढे आहेत. अंकगणित, बीजगणित आहे, भूमिती आहे पण आपण मॅथ्स, जॉमेट्री आणि ऑलजिब्रा शिकतांना जीव घाबरा करीत का असतो कळतच नाही.

आपल्या मातृभाषेतून आपण शिकलो तर व्यक्ती व्यक्तींचे परस्पर संबंध स्नेहपूर्ण, मैत्रीपूर्ण, सौहार्दपूर्ण करण्यास मदत होते. एकाने ‘राम राम’ म्हटले तर दुसऱ्याने राम राम केले तर जगाचे कल्याण होते इतकी ताकद या ‘राम राम’ मधे आहे. पण आम्ही ‘हाय… हाय’ करतो. पूर्वी नमस्कार करण्याची आपली संस्कृती आता हस्तांदोलन करून ‘कोरोनाला’ निमंत्रण देते हे एक उदाहरण आहे मातृभाषेपासून, तिच्या संस्कारांपासून दूर जाण्याचे.

आपल्या मातृभाषेचे महत्त्व, मराठीचे महत्त्व लक्षात घेऊन, जाणून बुजून पालकांनी मुलांच्या, शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या, मुख्याध्यापकांनी शिक्षकांच्या, शिक्षण संस्था चालकांनी मुख्याध्यापकांच्या, शिक्षण मंत्र्यांची शिक्षण संस्थेच्या भाषा विकासाच्या दृष्टीने ठोस पावले उचलण्याची आज नितांत गरज आहे. इंग्रजाळलेल्या विद्यार्थ्यांची ससेहोलपट होत आहे‌. इंग्रजी माध्यम, सेमी इंग्रजी माध्यम घेऊन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना फक्त रट्टा मारणे, पाठांतर करणे या पल्याड काही करायला स्कोपच उरला नाही. त्यांचा वेळ, त्याचे बालपण, किशोरावस्था इंग्रजी भाषेच्या अध्ययनात इतकी शक्ती खर्च होते की त्यांची स्वतःची कल्पनाशक्ती, सर्जनशीलता, सौंदर्य, वाङमयाची वाचनाची गोडी संपुष्टात आली आहे. त्यांना धड इंग्रजी येत नाही आणि धड मराठी ही नाही. दुकानदाराने त्रेपन्न/चौरेचाळीस, एकोणपन्नास असे आकडे उच्चारले की त्यांची तोंडे 10वे आश्चर्य बघितल्यासारखे होतात आणि तोंडाचा विस्फारलेला ‘आ’ 53/ 44/ 49 असे म्हणत बंद होतो. मातृभाषेचा हा विद्यार्थी फक्त परीक्षार्थी होतो हे एक धोकादायक सत्य आहे.

स्पर्धेच्या युगात गुणपत्रिकेतील गुणांपेक्षा काहीच महत्त्वाचे नाही का? त्यांचा आत्मविश्वास, त्यांचा सभाधीटपणा, वक्तृत्व, कर्तृत्व, संवादकौशल्य, त्यांची देहबोली, त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास मातृभाषेला डावलून खरंच पुरेसा होणार आहे का?

बालकाचे व्यक्तिमत्त्व घडविताना तो सर्वगुणसंपन्न नागरिक घडावा. त्याने जबाबदारीने समाजाचे नेतृत्व करावे. देशाची धुरा सांभाळावी. अशी काळाची गरज असेल तर मातृभाषा व मातृभाषेतून शिक्षण गरजेचे आहे. आजच्या काळाची ती गरज आहे. महाराष्ट्रात 69 % लोक (अंदाजे) मराठी भाषिक आहेत. भारतात बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठीचा क्रमांक तिसरा आहे (2011च्या जनगणनेनुसार) याचा अर्थ मराठी बोलणाऱ्यांचे, मातृभाषा असणाऱ्यांचे प्रमाण भारतात जास्त आहे. असे असून हवी तशी प्रगती नाही. कारणं शोधली तर खूप आहेत.

पण महाराष्ट्रात मराठीला हवं तसं वैभवशाली, समृद्ध, मातृभाषेला मनामनात जनाजनात स्थान मिळाले हे मात्र स्वप्न अपूर्ण आहे असे म्हणतांना खेद होतो. पण हे स्वप्न पूर्ण झाल्याचे स्वप्न पडू लागले आहे. कारण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषेकडे विशेष लक्ष देण्याचे निश्चित झाले आहे.

प्राथमिक शिक्षण मराठीतच द्यायचे हे धोरण 100% पूर्णत्वास आणले पाहिजे. सध्या जे 12वीला ऐच्छिक विषय आहेत त्यात मराठी सोडून इलेक्ट्रॉनिक किंवा कॉम्प्युटर सायन्स किंवा अनेक विषय हे बंद झाले पाहिजे. 3 ते 14 वर्षापर्यंत मराठीचा पाया पक्का झाला की पुढे चांगले शिक्षण घेता येते. सगळ्या विषयातील विचारवंताचे विचार, मते, भावना, शोध हे चांगले समजले की त्यांच्या/विद्यार्थ्यांना विचारांना कल्पनेला सर्जनशीलतेला चालना मिळेल आणि त्यांचे विचार त्यांच्या आचारातून दिसून येतील. ते ही आपल्या कल्पना साकारतील. कृतीत आणतील. वाङमयाची, मराठीची गोडी लागून त्यातील काव्यसौंदर्य, भावसौंदर्य, विचारसौंदर्याचा आनंद घेतील. त्या आनंदातूनच नवीन मराठी लेखक, कवी, समीक्षक, संशोधक जन्म घेतील पण त्यासाठी अशी स्थिती हवी की –

आमुच्या घराघरात वाढते मराठी

येथल्या चराचरात राहते मराठी

एवढ्या जगात माय मानतो मराठी….

सुरेश भटांच्या या कवितेतील शब्द न् शब्द, ओळ न् ओळ साक्षात अवतरली पाहिजे आणि –

येथल्या दिशादिशात दाटते मराठी 

येथल्या नभामधून वर्षते मराठी 

आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी 

येथल्या कळीकळीत लाजते मराठी….

प्रत्येक मराठी माणसाला आपण महाराष्ट्रात जन्माला आलो याचा, मराठी भाषेचा अभिमान वाटला पाहिजे. आपल्या पाल्यांना मराठी माध्यमात शिकायला पाठवितांना अभिमानाने मान उंचावली पाहिजे आणि ओठात शब्द आले पाहिजे

(लेखिका शिक्षणतज्ज्ञ आहेत आणि विद्या भारती पश्चिम दक्षिण नागपूरच्या उपाध्यक्ष आहेत.)

पुढे वाचा : अंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस

Facebook Comments