सुजाण पालक हो…

✍ शैलेश जोशी

गाय म्हणजे आपली माता। अर्थातच देशी हं। जिच्या पाठीवर वशिंड (उंचवटा) असतो ती। जन्मतःच तिचे नामकरण होते। ती कधी कपिला, कधी नंदिनी तर कधी गौरी असते। लहान बालकांना तर तिचे आकर्षणच असते। मुले नुसतीच तिला स्पर्श करतात असे नाही तर बालके तिच्या अंगावर खेळतातही। त्यांना काही भीती नाही आणि तिलाही त्याचा त्रास नाही।

गायीला भावना असतात। घरातल्या घडणाऱ्या घटनांचा परिणाम तिच्यावरही होतो। दुःखद घटने प्रसंगी कधी आम्ही तिच्या डोळ्यातून अश्रू निघतानाही पाहिलेत। आपल्या भावना अश्रूंच्या वाटेच व्यक्त करीत असते। तिला नावाने हाक मारली की आपल्याकडे बघते। रस्त्याने जाताना वाहनांच्या आड कधीच येत नाही। हॉर्न वाजवतात लगेच बाजूला होऊन निमूटपणे वाट करून देते। असे म्हणतात आईच्या दुधानंतर सर्वप्रथम स्थान गायीच्या दुधाचे असते। ते दूध म्हणजे अमृत। सुवर्णाचा अंश जो त्यामध्ये असतो ना! पंचगव्याचा उपयोग आपल्याला सांगायला नकोच। गोमय आणि गोमूत्राशिवाय शेती म्हणजे मृत्यूकडे ढकलणेच नव्हे काय? अनेक नवजात बालकांना सुपात ठेवून गाईसमोर ठेवतात। गायीने त्याला हुंगावे अशी अपेक्षा असते। त्यामुळे बाळाचे दोष दूर होऊन त्याची शांती होते असे म्हणतात। आज विज्ञानाने जरी यामागील तत्त्व सिद्ध केले नसेल तरी आपल्या पूर्वजांना त्याचे ज्ञान निश्चितच होते, नाहीतर ते असा संस्कार करण्याची पद्धतच सुरू करणार नाहीत।

एक ना अनेकरित्या गायीचे अधिक महत्त्व आपल्याला पटविता येईल। असे गुणधर्म असलेली गाय आणि जर्सी सारखीच काय हो? जर्सी केवळ पैसे कमवण्यासाठी दूध देणारा प्राणी – यंत्रच म्हणाना! ना भावना – ना गुणधर्म!

जो फरक देशी गायींचा गुणधर्म व जर्सी प्राण्याचा गुणधर्म यामध्ये आहे असाच फरक मातृभाषेतून शिक्षण व इंग्रजी भाषेतून शिक्षण यात आहे। आपल्या पाल्यालाही शिशु अवस्थेपासून इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणातून जर्सी सारखेच तयार करायचे आहे काय? भावनाशून्य? दोषयुक्त? पैसे कमवण्याचे यंत्र? नाही ना?

मग आपण मुलांना इंग्रजी माध्यमात का शिकवीत आहोत? भावनाशून्य, आकलनशून्य होण्यासाठी का? इंग्रजी माध्यमात शिकणे ही बालकाची गरज आहे काय? इंग्रजी भाषा मोठे झाल्यावरही सतत ऐकण्याने शिकता येते, बोलता येते। शिशु अवस्थेपासूनच मातृभाषेच्या शिक्षणापासून वंचित झाल्यामुळे अनेक बाबींचे आकलन न झाल्यामुळे ‘स्व’ चा विसर पडलेली ही मुले समाज व्यवस्थेला पर्यायाने राष्ट्राला कुठल्या स्थितीत नेऊन टाकतील? वेळीच जागे व्हा। आपल्या देशात वृद्धाश्रम नव्हते। विभक्त कुटुंब पद्धतीही फार नंतर आली। घटस्फोटांचे प्रमाण इतके नव्हते। आरोग्याच्या समस्या इतक्या नव्हत्या। स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार नव्हता। असे बदल का घडले याचा विचार करा।

मातृभाषेत शिक्षणाने शिशु अवस्थेपासूनच उत्तम आकलन होते। वैद्यक शास्त्रानुसार वय वर्षे सहा पर्यंत मेंदूचा 85% विकास होतो तर मेंदूला जाणाऱ्या सूचना कोणत्या भाषेत दिल्या जाव्यात? ज्या भाषेत कळेल त्याच ना? विचार करा आणि आजच जागे व्हा। देशासाठी पुढच्या पिढीला उत्तम घडवणे आमचे गृहस्थी जीवनाचे पहिले कर्तव्य आहे। गृहस्थाश्रमात प्रवेश करतेवेळी प्रत्येकाने याचा विचार करणे आवश्यक आहे। त्यावेळी नसेल केला तर आज करा। भारतीय संस्कार पद्धती मध्ये विवाह हा संस्कार आहे। केवळ मौज करण्यासाठी विवाह करणे किंवा गृहस्थाश्रमात प्रवेश करणे उचित नाही। देशाचे भविष्य उज्वल घडवण्याचे सामर्थ्य ज्या पिढीत असते ती पिढी घडवण्याचे कार्य गृहस्थी माणसांना करायचे असते। आपण सुजाण पालक या नात्याने योग्य विचार करालच। अस्तु।

(लेखक विद्या भारतीच्या विदर्भ आणि देवगिरी प्रांताचे संघटन मंत्री आहेत।)

और पढ़ें : भारत केन्द्रित मातृभाषा शिक्षा

Facebook Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *